| सुधागड-पाली | वार्ताहर |
बँक ऑफ इंडिया पाली शाखेतून सोमवारी (दि.22) ज्येेष्ठ नागरिक मनोहर देशमुख यांच्याकडील साडेतेरा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मनोहर देशमुख यांनी पाली बँक ऑफ इंडिया बँकेतून 45 हजार रुपये काढले. आणि ते तेथेच पैसे मोजत उभे होते. अशावेळी त्यांच्या शेजारी माणूस नोटा खराब आहेत, लिहिलेल्या नोटा चालत नाहीत, रबर काढून नीट पहा, एकदा मोजून घ्या असे सांगून बोलण्यात गुंतवून ठेवले व पैसे मोजण्याच्या बहाण्याने 45 हजार रुपयांच्या बंडल मधून साडेतेरा हजार रुपये सराईतपणे काढून तेथून पोबारा केला. त्याच वेळी तिथे उभा असलेल्या चोराच्या दुसऱ्या साथीदाराने देखील देशमुख यांना बोलण्यात गुंतविले आणि साथीदार बँकेबाहेर गेला. ही बाब लागलीच लक्षात आल्यावर देशमुख यांनी आपला मुलगा अभिषेक देशमुख याला फोन करून बँकेत बोलवले. आणि त्यानंतर पाली पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यासंदर्भात पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी बँकेतून सीसीटीव्ही फुटेज मागून या प्रकरणाचा तपास करणार अलस्याची माहिती दिली.