| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतीचे नळपाणी योजनेचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने वीज जोडणी एक सप्टेंबर रोजी कापली होती. ग्रामपंचायतीने महावितरणचे 76 लाखांचे बिल थकविले असून, महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शन कापले आहे.
नेरळ ग्रामपंचायतीचे थकीत वीज बिल आणि वीज जोडणी कापण्याच्या घटनेचे पडसाद ग्रामसभेत ग्रामस्थांनी जोरात गदारोळ केला होता. त्यात गणेशोत्सव जवळ आल्याने नेरळ गावातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली. त्यावेळी गणेश उत्सव काळात नेरळ गावातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत याची माहिती देवून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती आमदार महेंद्र थोरवे यांना करण्यात आली.आमदार थोरवे यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी यांना बोलावून घेत नेरळ ग्रामपंचायतचे वतीने बिल भरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्याची सूचना केली.त्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. रात्री आठ वाजता महावितरण कंपनीचे सहायक अभियंता यांनी कापलेली वीज जोडणी बोरले येथील पंप गृह येथे येऊन जोडून दिली. त्यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर देशमुख, ग्रामसेवक अरुण कारले, उपशहर प्रमुख सचिन खडे, मुबा नजे, विकी कटारिया, मनोज मानकामे सचिन जाधव, प्रमोद कराळे, देवा दाबणे, सूरज साळवी, ऋषी पाटील व महावितरण आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.