शिवसेना ठाकरे गटाचा विश्वास
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी ठोकशाही, दडपशाही चालविली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिंदे गटाची बदनामी करण्याची काहीही गरज नाही. दरम्यान, शिवसेना पक्ष हा ठाकरे यांचा पक्ष असून, तुम्ही ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार आहात, त्यामुळे पुढील वेळी शिंदे गटाचे म्हणून निवडून येऊन दाखवा, तुम्हाला धडा शिकवायला मतदारसंघातील जनताच आसुसलेली आहे, असा गंभीर इशारा देतानाच कर्जत आणि खालापूर तालुक्यात कोण ठोकशाहीने वागत आहे हे सर्वांना माहिती असून, पुढील दोन महिन्यांत तुमचा निकाल लावण्याचे काम जनताच करील, असा विश्वास शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी व्यक्त केला.
कर्जत येथील शिवालय कार्यालयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तातडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक बाबू घारे आदी उपस्थित होते. त्यावेळी नेरळ येथे भररस्त्यात, बाजारपेठेत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता एका व्यक्तीला मारहाण करतो आणि त्यानंतर त्याबाबतची व्हिडिओ चार दिवसांनी व्हायरल झाल्यावर आमदार महेंद्र थोरवे हे ते दोघे कार्यकर्ते आपलेच असून, ठाकरे गटाने आमच्या पक्षाची बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे, असा आरोप केला होता. त्या आरोपाचे खंडन करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेत उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी आमदारांचे सर्व आरोपांचे खंडन करीत तुमच्या पगारी बॉडीगार्डने यापूर्वी प्रसाद सावंत यांच्यावर हल्ला केला होता.
मात्र, दोन वर्षांनी का होईना, तो शिवा भाई हा कार्यकर्ता आपलाच आहे हे मान्य केले. त्यामुळे मतदारसंघात दडपशाही, गुंडशाही आणि ठोकशाही कोण करीत आहे, हे वेगळे सांगायला नको. मात्र, त्या सर्वांचा हिशोब मतदारसंघातील जनता दोन महिन्यांनी नक्की देईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. भाडोत्री कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील वातावरण गढूळ करण्याचा डाव असून, मतदारसंघातील लोक तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सरकारी अधिकारी यांच्यता भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे अधिकारी वर्गाने जनतेच्या बाजूने काम करावे, कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, असे आवाहन शिवसेना ठाकरे पक्षाने केले. आमदार म्हणतात आम्हाला ठाकरे गट बदनाम करीत आहेत, मात्र त्यांनीच शिवा भाई हा माझा कार्यकर्ता आहे हे मान्य केले असल्याने जनताच त्यांचा खरा चेहरा जाणून आहे. त्यामुळे आम्हाला तुमची बदनामी करण्याची गरज नाही, असे ठाम मतदेखील त्यांनी व्यक्त केले.
ते आमचे वैयक्तिक भांडण: बांदल
आमदार महेंद्र थोरवे बॉडीगार्ड कर्जत मारहाण प्रकरणात मारहाण करणारा तरुण हा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड नाही, असा खुलासा मारहाण झालेला तरुण अमोल अमर बांदल यांनी केला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा दावा नेरळमध्ये मार खाणारा तरुण अमोल अमर बांदल यांनी केला आहे. आमचे वैयक्तिक वादातून भांडण झाले असून, त्यात आमदारांचे नाव गोवण्याचा विरोधक प्रयत्न करीत असून, आपण स्वतः त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा करीत आहोत, असे अमोल अमर बांदल यांनी नमूद केले आहे.