जाता जात दणका देण्याचा अंदाज
| पुणे | प्रतिनिधी |
पावसाळा संपला असून, आता परतीच्या दिशेने मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. राजस्थान व कच्छ काही भागातून सोमवारी (दि. 23) मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला आहे. गतवर्षी 25 सप्टेंबर रोजी मान्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.
मान्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसामधान तारखांचे सुधारित वेळापत्रकानुसार 17 सप्टेंबर ही मान्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, गेली काही वर्षे मान्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबत आहे. यंदाही तब्बल सहा दिवसाने (दि. 23) मान्सूनने राजस्थानातून माघारीस सुरूवात केली आहे. दि. 2 जुलै रोजी संपूर्ण देशात पोहोचलेल्या मान्सूनने दोन महिने आणि 21 दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.
यंदाच्या हंगामात 19 मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेला मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये पोहोचला. अरबी समुद्रातून प्रगती करत 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर 23 जून रोजी मान्सूनने महाराष्ट्र व्यापला. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याने उद्या (दि. 24) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या पंजाग, हरियणणा, गुजरात राज्याच्या काही भागातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या परतीच्या प्रवासात मध्य भारत व मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा हवामान विभागानूसार देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सुमारे 106 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार देशातील अनेक भागामध्ये सरासरी पावसाची नोंद झाली.
गेल्या पाच वर्षांतील मान्सूनची परतीची वाटचाल
वर्ष तारीख
2019 9 ऑक्टोबर
2020 28 सप्टेंबर
2021 6 ऑक्टोबर
2022 20 सप्टेंबर
2023 25 सप्टेंबर
2024 23 सप्टेंबर