। अलिबाग । प्रतिनिधी ।
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रोहा तालुक्यातील संतोष दिवकर यांना शासनाचा कृषीभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांना विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या सहिचे नुकतेच शासनाचे पत्र देण्यात आले.
संतोष काशीनाथ दिवकर हे रोहा तालुक्यातील यशवंतखार येथील रहिवासी आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचे चांगले योगदान राहिले आहे. शेतीवर नवनवीन प्रयोग करून आधूनिक पद्धतीने सेंद्रीय शेती करण्यावर त्यांनी भर दिला. शेती क्षेत्रात आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच नवनवीन प्रयोग करीत एक प्रगत शेतकरी म्हणून ते आदर्श ठरले आहेत. त्यांच्या कार्याची दखल राज्य शासनाने घेत कृषी विभागाचा मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2021 वर्षाचा कृषीभूषण पुरस्कार त्यांना जाहिर केला आहे. संतोष दिवकर यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असताना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.