। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील माथेरान येथे असलेल्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे बसविण्यात आले आहे. माथेरान शहरातील केबल व्यवसायिक अल्ताफ केबलवाले यांनी शाळेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे सर्व यंत्रणासह उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान, माथेरान मधील गव्हाणकर विद्यामंदिरात सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले असून शाळेतील विद्यार्थी सुरक्षित होण्यास मदत झाली आहे.
माथेरानमध्ये मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा शहराच्या एका भागात असून त्या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थी सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेत असावेत, अशी शाळेची अपेक्षा होती. मात्र, खासगी संस्था असल्याने शाळेत ही व्यवस्था करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यातच बदलापूर येथील शाळेत घडलेली घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता. यामुळे पालकवर्ग याबाबत शाळा व्यवस्थापनाकडून अपेक्षा करीत होते. पालक वर्गाची ही मागणी लक्षात घेत माथेरानमधील केबल व्यवसायिक असलेले अल्ताफ केबलवाले यांनी प्राचार्य गव्हाणकर विद्यामंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याचा निर्णय घेतला.
अल्ताफ केबलवाले यांनी प्राचार्य गव्हाणकर संस्थेची परवानगी घेऊन आपल्या डेन केबलच्या माध्यमातून शाळेच्या आवारात तसेच शाळेच्या विविध सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. हे कॅमेरे विद्या मंदिरातील वर्गखोल्या इयत्ता आठवी, नववी, दहावी या ठिकाणी तसेच शौचालयाकडे जाणारा मार्ग, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा येथे बसवून घेण्यात आले आहेत. यानंतर या कॅमेरांमधून कैद होणारे प्रक्षेपण विद्यालयात एका ठिकाणी दिसावे यासाठी मुख्याध्यापक कार्यालयात एलईडी आणि डीव्हींआर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेच्यावतीने मुख्याध्यापक कल्पना पाटील यांनी अल्ताफ केबलवाले यांचे आपल्या शाळेला सीसीटिव्ही कॅमेरे यंत्रणा बसवून देण्याबद्दल आभार मानले आहेत.