दोघेही रुग्णालयात उपचारासाठी दाखल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थकांमध्ये सोमवारी (दि. २३) सायंकाळी जोरदार हाणामारी झाली. शासनाने माती उत्खननप्रकरणी आकारलेला दंड देण्यावरून दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामध्ये दोघेही जखमी झाले असून, अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही वायशेत येथील असून, व्यावसायिक आहेत. खडी, माती उत्खनन करून ती विक्रीला पाठविण्याचे काम ते करीत आहेत. मात्र, अनधिकृत व्यवसाय चालविल्यामुळे त्यांच्यातील एकाविरोधात महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली होती. दंड भरण्यावरून दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरु होता. हा वाद अखेर विकोपाला गेला. सोमवारी सायंकाळी दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. त्याचे पर्यवसान मोठ्या राड्यात झाले. अखेर रागाच्या भरात एकमेकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत, तर दुसऱ्याच्या हाताला दुखापत झाली. त्यांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. एकमेकांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.