ठेकेदाराने बांधकाम साहित्य ठेवून केले गोडाऊन
| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील ग्रामपंचायत पिरकोन हद्दीतमधील पाणदिवे येथील हुतात्मा परशुराम रामा पाटील स्मारकाचे गोडाऊन करण्यात करण्यात आले आहे. येथील एका ठेकेदाराने मागील दोन वर्षांपासून बांधकामाचे साहित्य ठेवून हुतात्म्यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितेश पाटील यांनी केला आहे. हुतात्मा स्मारकाच्या दुरवस्थेला जबाबदार असणार्या संबंधित व्यक्तीविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परंतु, या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाच्या अधिकार्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही श्री. पाटील यांनी केला असून, कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत हकीकत अशी की, अशोक शेडगे या व्यक्तीने हुतात्मा परशुराम रामा पाटील स्मारक पाणदिवे येथे जलजिवन मिशन या योजनेच्या कामाचे बांधकाम साहित्य गेल्या दोन वर्षांपासून ठेवले आहे. सदरचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. हुतात्मा स्मारक ही पाणदिवे गावाचे मंदिर, प्रेरणास्थान आहे, तरी याठिकाणी बांधकामाचे साहित्य ठेवून गोडाऊनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पाणदिवे गावाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सदर ठेकेदार करित आहे. या व्यक्तीला वारंवार सूचना देऊनही साहित्य उचलण्यात आलेले नाही. हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने हुतात्मा स्मारकाची पडझड झाली आहे. हुतात्मा स्मारकचे विदरूपीकरण झाले आहे, यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरोधात हुतात्मा स्मारकाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा. याबाबत कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच हुतात्मा दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा पिरकोन ग्रामपंचायतचे सदस्य तथा काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात नितेश पाटील यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम, पिरकोन ग्रामपंचायत सरपंच कलावती पाटील व उरण पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहारदेखील केला आहे.
शासनास हुतात्म्यांचा विसर
देशातील स्वातंत्र्य संग्रामातील 25 सप्टेंबर 1930 साली ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन चिरनेर आक्कादेवीच्या जंगलात इतिहास घडवला. तो दिवस इतिहासातील सुवर्ण पान ओळखला जातो. सविनय कायदेभंगाच्या या चळवळीत अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यामध्ये हुतात्मा परशुराम रामा पाटील यांचाही समावेश होता. त्यांचे स्मारक पिरकोन हद्दीतील पाणदिवे येथे उभारण्यात आले आहे. परंतु, त्यानंतर शासनास या स्मारकाचा विसर पडल्याचे येथील परिस्थितीवरुन दिसून येते. या स्मारकाची अद्याप डागडुजी करण्यात आलेली नाही. रंगरंगोटी, स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र, याकडे शासन आणि संबंधित प्रशासनान लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.