। पनवेल । वार्ताहर ।
गोरगरीब मुलींचा व महिलांचा देह व्यवसायासाठी उपयोग करणारा दलाल नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडून जेरबंद करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाकडून ही धडाकेबाज कामगिरी करण्यात आली आहे. आरोपी वैजद अली खान उर्फ राजू मंडल (29) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, संशयित मोतीन व शायना यांचा पोलीस शोध घेत आहेत.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेत्तृत्वाखाली पनवेलमधील करंजाडे परिसरात सापळा रचत या दलालाला अटक करण्यात आली आहे. यासंबंधित आणखी दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. सापळा कारवाईत तीन महिला व एक बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपी वैजद अली खान उर्फ राजू मंडल हा कुख्यात दलाल असून तो मोतीनच्या साथीने गरीब महिलांना पैशाचे आमिष देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. तसेच, कारवाईत आढळून आलेल्या अल्पवयीन बांगलादेशी मुलीचा पुरवठा शायना या महिला दलालाने केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पिटा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.