| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरे यांच्याविरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांनी सोमवारी (दि. 23) सहाय्यक निबंधक अमोल निरडे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.
सभापती रमेश मोरे यांनी वेळोवेळी सदस्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, विश्वासात न घेता परस्पर केलेले आर्थिक व्यवहार, कागदपत्रांमध्ये असणारी अनियमितता यामुळे संचालकांना संस्थेचे कामगाज करण्यास अडचण येत होती. त्याचप्रमाणे परिसरातील शेतकर्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे बाजार समिती ही शेतकर्यांच्या हितासाठी चालावी म्हणून अविश्वास ठराव दाखल केला असल्याचे संचालकांनी खासगीत बोलताना सांगितले. यावेळी रायगड जिल्हा बँक संचालक अस्लम राऊत, भाजपा युवक जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे, उपसरपंच दिनेश गुगळे व संचालक, सदस्य उपस्थित होते. यासंदर्भात सहाय्यक निबंधक माणगाव अमोल निरडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अविश्वास ठराव दाखल झाला असून, काही दिवसातच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.