। पनवेल । वार्ताहर ।
कामोठ्यात भुरट्या चोरांनी आता चोरी करण्याचा मोर्चा रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांकडे वळवला आहे. रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या व्हॅगनार गाडीचे मागील टायरसहित दोन चाक काढून नेल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास सुरू आहे.
कामोठे येथील सेक्टर-19 मध्ये प्रेसिडेन्सी हाऊसिंग सोसायटीमध्ये विनायक शिराळकर हे राहत आहेत. व्यवसायाने सोसायटी लेखापरीक्षण करणारे लेखापरीक्षक आहेत. त्यांच्या मालकीची (एमएच-02-सीबी-1633) व्हॅगनार गाडी त्यांनी सोसायटीच्या जवळील रस्त्यावर उभी करून ठेवली होती. मात्र, चोरट्यांनी या गाडीचे लॉक तोडून आतील सामान अस्ताव्यस्त केले. गाडीतला जॅक काढून टायर्ससहित चाकं काढली. सकाळी कामानिमित्त निघत असताना गाडीची चाके चोरीला गेल्याचे विनायक शिराळकर यांच्या निदर्शनास आले. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीची तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. याबाबतचा अधिक तपास कामोठे पोलीस ठाणे करीत आहे.