समूह शेतीला प्रोत्साहन देण्याची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्या नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा शेतकरी सदस्यांच्या प्रश्नांनी गाजली. यावेळी शेतकर्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना संचालक मंडळाला उत्तरे देता आली नाहीत. तर, सुरुवातीला मागील सभेच्या इतिवृत्तावरून संचालक मंडळात एक वाक्यता नसल्याचेदेखील दिसून आले. तर, काही शेतकर्यांनी समूह शेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन संचालक मंडळाला केले आहे.
चाळीसहुन अधिक गावातील शेतकरी सदस्य असलेल्या नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा नेरळ येथील शेतकरी भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र झांजे यांची निवड करण्यात आल्यानंतर सभेला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र विरले, सचिव श्रीकांत पिंगळे यांच्यासह संचालक राजेंद्र हजारे, वैभव भगत, यशवंत कराळे, अर्चन शेळके, विष्णू कालेकर, शशिकांत मोहिते, कुंदा सोनावळ, सावळाराम जाधव, नारायण तरे, धोंडू आखाडे आदी उपस्थित होते.
यावेळी सभेत बेकरे शेतकरी अॅड. जयेंद्र कराळे यांनी रायगड जिल्हा बँकेत शेतकर्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याची तक्रार केली. तर, वंजारपाडा येथील शेतकरी दत्तात्रय मिसाळ यांनी आम्हाला शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा फायदा मिळाला नसून सोसायटीकडून जाणीवपूर्वक विरोधी पक्षाच्या शेतकर्यांना कर्जमाफी दिली जात नसल्याची तक्रार केली. पुढे जेष्ठ शेतकरी नागो गवळी यांनी शेतकर्यांना दिली जाणारे कृषी कर्जाची वसुली किती आहे, वेळेत कर्जाची परतफेड न करणार्या शेतकर्यांना लावण्यात येणार्या व्याजाची माहिती देण्याचीदेखील मागणी केली. तर, तळवडे येथील शेतकरी दिलीप शेळके यांनी नेरळ विविध कार्यकारी सोसायटीने शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समूह शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. समूह शेती किंवा गट शेती करण्याची इच्छा असलेल्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी योजना प्रत्यक्षात आणावी अशी मागणी केली. तर कृषी कर्ज हे 12 महिन्यासाठी असावे अशी मागणीदेखील शेळके यांनी केली.