| अलिबाग | वार्ताहर |
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून मोठ्या रक्कमेच्या फायद्याचे आमिष दाखवून अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथील एका तरुणाची तब्बल 33 लाख 43 हजार 100 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग चेंढरे येथील तरुणाची 13 डिसेंबर ते 26 सप्टेंबरदरम्यान फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या मोबाईल नंबरवर इंडीयन स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट नावाने व्हॉटसअॅप ग्रुप आहे. तीन अनोळखी व्यक्तीनी तरुणाला एक लिंक पाठवली. ती लिंक फिर्यादींनी डाउनलोड करताच त्यांच्या मोबाईलमध्ये आरओएआरके हे अॅप्लीकेशन डाउनलोड झाले, त्यावर कोणताही अकाउंट नंबर नसलेले अकाउंट तयार करून वरील व्हॉटसअॅप ग्रुपवर शेअर्स मार्केटबाबत शेअर्स खरेदी, विक्रीबाबत माहीती देऊन शेअर्सकरीता बॅक अकाउंट नंबर पाठविण्यात आला. त्यावर वेळोवेळी पैसे पाठविण्यास सांगितल्याने तरुणाने तीन आरोपींच्या सांगण्यावरून त्यांच्या एच.डी.एफ.सी. बॅक खाते यावरील एकूण 33 लाख 43 हजार 100 रक्कम ट्रान्सफर केली. ट्रान्सफर करण्यात आलेली रक्कम परत मिळविण्याकरीता मार्गदर्शन फी म्हणुन रक्कम 3 लाख असे भरावे लागतील असे सांगण्यात आले. सांगितलेली रक्कम न भरल्याने तीन आरोपी यांनी मेसेजला रिप्लाय देणे बंद करून आरओएआरके या अॅप्लीकेशनवर रक्कम रूपये 33 लाख 43 हजार 100 व त्यावर प्रॉफिट रक्कम रूपये 92 लाख 97 हजार 667 मिळाल्याचे दाखवुन तरुणाचा विश्वास संपादन करून रक्कम रूपये 33 लाख 43 हजार 100 ची फसवणुक केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनि किशोर साळे हे करीत आहेत.







