तीन लाखांच्या लाचेची मागणी
| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील एका तलाठ्याने उत्खननाची दिलेली नोटीस रद्द करून कारवाई न करण्याकरिता धोंडसे येथील व्यक्तीकडून तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 30) रात्री 10 वाजताच्या सुमारास पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुधागड तालुक्यातील धोंडसे येथील तक्रारदार यांनी आपल्या जमिनीमध्ये घर बांधायचे असल्यामुळे व झाडे लावायची असल्यामुळे रस्ता बनवला होता. हा रस्ता बनवताना जमिनीतील माती बाजूला केली असल्याने सदर जागेत मातीचे बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचे उद्धव गुंजाळ (50) तत्कालीन तलाठी सजा नाडसूर सध्या नेमणूक तलाठी सजा वाघोशी तालुका सुधागड यांनी तक्रारदारांना सांगून रुपये दहा लाख दंड भरावा लागेल असे सांगितले. आणि तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार याने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी 7 ऑगस्ट 2024 पाली-सुधागड तहसील कार्यालय येथे तलाठी उद्धव गुंजाळ याने तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. परंतु, तक्रारदार यांच्या हालचालीवर संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे सोमवारी (दि. 30) तलाठी उद्धव गुंजाळ यांच्याविरोधात पाली पोलीस ठाणे येथे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड-अलिबाग शशिकांत पाडावे करीत आहेत. पोलीस अधीक्षक लाचलुचत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, ठाणे सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडली. लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणार्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याशी संपर्क साधावा.