। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयामार्फत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौध्दीक व शारिरीक क्षमता वाढीसाठीदेखील वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे जेएसएम महाविद्यालय व डिफेन्स अकॅडमी अलिबागमार्फत विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे नुकतेच देण्यात आले. या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सध्या घडलेल्या उरण, बदलापूर आणि कोलकत्तामधील बलात्कार आणि हत्याकांडानंतर स्वसंरक्षण ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर डिफेन्स अकॅडमी मार्फत जे.एस.एम.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आणि संस्कारक्षम व सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या आजूबाजूला असलेल्या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनातील आपण सुरक्षित असण्याची भावना कमी होण्यास सुरुवात झाली आहे. अशा व्यक्तींना किंवा व्यक्ती समूहाला उत्तर देण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे संरक्षण करण्याएवढे सक्षम असणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांसाठी स्वरक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, डिफेन्स अॅकेडमीमार्फत विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन स्वरक्षणाचे धडे घेतले. यावेळी समरेश शेळके, अनिकेत म्हामुणकर, प्रणय म्हात्रे, अमिषा भगत, अक्षय पाटील, हर्षल अहिरे यांनी प्रशिक्षण देण्याबरोबरच मार्गदर्शन केले.