। अलिबाग । प्रमोद जाधव ।
लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी सन्मान कार्यक्रम माणगाव येथे बुधवारी घेण्यात आला. या कार्यक्रमात महिलांना पाचारण करण्यात आले. त्यासाठी रायगडमधून 250 बसेस पाठविण्यात आल्या. अचानक एसटी बसेस फेर्या रद्द केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नियमीत प्रवास करणार्या प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी जाण्यासाठी बसेस उपलब्ध न झाल्याने सरकारच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव, रोहा, महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा असे आठ बस आगार असून 19 स्थानके आहेत. जिल्ह्याती 380 हून एसटी बसेस आहेत.दिवसाला एक लाखाहून अधिक प्रवास एसटीतून करतात. एसटीला त्यातून सुमारे 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु मंगळवारी (दि.8) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी हजारो महिलांना बोलावण्यात आले. या कार्यक्रमाला येणार्या महिलांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाकडून बसेस मागविण्यात आल्या. रायगड विभागातून 250 बसेस पाठविण्यात आल्या. जिल्ह्यात एसटी बसचा तुटवडा असताना या कार्यक्रमाला अडीचशे बसेस पाठविल्याने जिल्ह्यातील अलिबागसह अनेक आगारात बसेसचा तुटवडा निर्माण झाला. बुधवारी सकाळी शाळा महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांसह कर्मचारी व अन्य प्रवाशांचे हाल झाले. एसटी बसच्या तीनशेहून अधिक फेर्या रद्द झाल्याने अनेक गावे, वाड्यांमधील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक स्थानकात तासनतास बसची वाट पहाण्याची वेळ प्रवाशांवर आली. काही प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाचा अधार घेत निश्चित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी देखील परतीच्या मार्गाव जाणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अलिबाग पनवेल मार्गावर जाणार्या प्रवाशांना विना थांबा बसचा अधार घ्यावा लागला. एसटी बसचा तुटवडा असल्याने शिल्लक असलेल्या बसच्या मदतीने स्थानकातील व्यवस्थापनाने प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात फारसे यश आले नाही. याबाबत विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता, तो संपर्क होऊ शकला नाही.
बोटावर मोजण्या इतक्या बसच्या भरोवश्यावर सेवा
अलिबाग एसटी बस आगारातील 52 एसटी बसेस पैकी 35 बसेस माणगावच्या कार्यक्रमाला पाठविण्यात आल्या. त्यामुळे रोहा, पेण, पनवेल, मुरूड, रेवदंडा मार्गावरी ल काही फेर्या रद्द करण्याची वेळ आगार व्यवस्थापकांवर आली. शिल्लक असलेल्या बस पैकी आठ साध्या व उर्वरित शिवशाही बसेसच्या भरोवश्यावर प्रवाशाना सेवा देण्याची वेळ आली. त्यामुळे अलिबाग स्थानकात बस नसल्याने प्रवाशांनी नाराजीही व्यक्त केली.
रायगडच्या एसटी बसवर दृष्टीक्षेप
एकूण बसेस - कार्यक्रमाला गेलेल्या गाड्या - रद्द फेर्या-
380 - 250- 300-