। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील 17 सदस्यीय नेरळ ग्रामपंचायतीमधील 16 पैकी 15 सदस्यांनी 18 जुलै रोजी राजीनामे दिले होते. त्यानंतर 50 टक्केपेक्षा कमी सदस्य शिल्लक राहिल्याने नेरळ ग्रामपंचायतीचे विसर्जन केले जाईल असे वाटत होते. मात्र सरकारी काम आणि चार महिने थांब याप्रमाणे तब्बल अडीच महिन्यांनी नेरळ ग्रामपंचायत विसर्जित झाली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच उषा पारधी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे 15 सदस्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. 18 जुलै रोजी ग्रामपंचायतीमधील एक रिक्त सदस्य वगळता विद्यमान 16 सदस्य पैकी 15 सदस्य यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर ते राजीनामे मंजूर झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार एकमेव सदस्य असलेल्या सरपंच उषा पारधी या ग्रामपंचायतीचे प्रशासन हाकत होत्या. सदस्यांचे राजीनामे आणि त्यांचे अहवाल यांचा प्रवास नेरळ ग्रामपंचायत ते कर्जत पंचायत समिती तेथून रायगड जिल्हा परिषद तेथून रायगड जिल्हाधिकारी आणि पुढे कोकण आयुक्त असा झाला.कोकण आयुक्तांनी त्या प्रकरणी 22 सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली आणि त्यांनतर सात ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतली. तब्बल अडीच महिन्याचा प्रवास पूर्ण झाल्यावर नेरळ ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा निर्णय झाला आहे.
या सुनावणीमध्ये रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून कोकण आयुक्त यांना प्राप्त झालेल्या अहवालात नेरळ ग्रामपंचायतीमध्ये राजीनामा दिलेल्या रिक्त 15 पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदत शिल्लक नाही, तसेच जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 मधील निवडणूक घेणार्या ग्रामपंचायतीमध्ये नेरळ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे सर्व लक्षात घेवून कोणीही एक व्यक्ती अल्पमतात ग्रामपंचायतीचा कारभार चालवू शकत नाही असे आपल्या अहवालात नमूद केले आहे.