। महाड । प्रतिनिधी ।
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी देखील तात्काळ करण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नाव बदलले तरी त्यांचा कायापालट कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र शासनाने सध्या अस्तित्वात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या पुढे स्थानिक पातळीवरील थोर पुरुष, महापुरुष व स्वातंत्र्यसैनिक यांची नावे जोडण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी देखील झाली आहे. त्यानुसार महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावात आता बदल होणार आहे. वीर मुरारबाजी देशपांडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असा नामोल्लेख आता यापुढे केला जाणार आहे.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे, पनवेल, पेण, महाड व कोल्हापूर या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. यापैकी महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्था गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास करत आहे. या ठिकाणी टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि आयटीआय एकाच परिसरामध्ये कार्यरत आहेत. महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नवीन इमारत मिळून वीस वर्षे झालेली आहेत. तर, टेक्निकल इन्स्टिट्यूटची इमारत अत्यंत जुनी असून या ठिकाणी येणार्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच बसावे लागत आहे. परिसरामध्ये गवताचे साम्राज्य वाढले असून इमारतीचे छप्पर गळू लागले आहे. इमारती शेजारी असलेल्या वृक्षांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
महाड आयटीआय ला लागलेली गळती काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. या परिसराला संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे. परिसरामध्ये वीज व्यवस्था नसल्याने रात्रीच्या सुमारास हा परिसर अंधारामध्ये असल्याने चोर्या होण्याचे प्रमाण देखील आहे. या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे असताना देखील शासनाने नाव बदलण्याला प्राधान्य दिले आहे. नाव बदल करण्याबरोबरच शासनाने या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा कायापालट केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीस्कर होणार आहे.







