। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी (दि. 24) सकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी कोसळून चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, या पाण्याच्या टाकीच्या ढिगाऱ्याखाली काही कामगार दबल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पिंपरी-चिंचवड पोलीस दाखल झाले आहेत.
भोसरीतील सद्गुरु नगरमध्ये लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या मजुरांसाठी बारा फूट उंचीवर पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. गुरुवारी (दि. 24) सकाळच्या सुमारास काही कामगार पाण्याच्या टाकीखाली अंघोळ करत असतानाच पाण्याची टाकी कोसळली. या घटनेत पाण्याची टाकी कोसळून दहा ते पंधरा कामगार त्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर मात्र आता या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर, काही जण गंभीर जखमी झाले असून सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.