। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नव्याने भर पडणारे विविध प्रकल्प, आयटी कंपन्यांमुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराची लोकसंख्या झपाट्यााने वाढत आहे. त्यामानाने उपलब्ध पोलीस ठाण्यांवर प्रचंड ताण पडू लागला आहे. यामुळे कायदासुव्यस्थेचा प्रश्नदेखील निर्माण होऊ लागल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने परिमंडळ-3चा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 1 पोलीस उपआयुक्त, 2 सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच 4 नवीन पोलीस ठाणेंची भर पडणार आहे. या प्रस्तावावर विधानसभा निवडणुकीनंतरच निर्णय होण्याची शक्यता असल्याने नवीन परिमंडळासाठी आणखी काही महिन्यांची वाट पहावी लागणार आहे.