| वसई | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, पालघरचे तापमान 33 अंश सेल्सियस इतके झाल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांना उन्हाची झळ सोसताना दमछाक होऊ लागली आहे. पोलीस प्रशासनालाही बंदोबस्ताच्या वेळी उष्णतेचा सामना करावा लागत आहे. परतीचा पाऊस गेल्यावर हळहळू तापमानात वाढ सुरू झाली आहे. त्यामुळे उष्णतेचा दाह निर्माण झाला आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरणे, त्यानंतर घरोघरी प्रचार, नागरिकांच्या गाठीभेटी, जाहीर सभा, प्रचार रॅली असे वातावरण निर्माण होणार आहे; मात्र उष्णतेत वाढ होत असल्याने जे कार्यकर्ते उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर पडत आहेत, त्यांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यापुढे मतदारांच्या गाठीभेटी घेताना उमेदवार घामाघूम होणार आहेत.
उन्हाचा चटका पालघर, बोईसर, डहाणू, नालासोपारा, वसई, विक्रमगड, अशा सहा विधानसभा पालघर जिल्ह्यात आहेत. त्यात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असून, गावोगावी फिरताना उन्हाचा चटका लागणार आहे. मंगळवारी व बुधवारी 32 अंश सेल्सिअंश, तर गुरुवारी 34 अंशावर तापमान जाणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या मैदानात आणि उकाड्यात कार्यकर्ते व उमेदवार प्रचाराचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. सकाळी व सायंकाळी प्रचाराला अधिक वेग येऊ शकतो.
पोलिसांना निवडणुकीदरम्यान बंदोबस्त असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात तापमानात झालेली वाढ पाहता पोलिसांवरही याचा परिणाम होणार आहे.