। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील पाटील आळीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मंडळाचे हे पंचावन्नावे वर्ष आहे. या कालावधीत मंडळाने अनेक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला आहे. गेल्या 49 वर्षांपासून मंडळाच्यावतीने दीपावलीच्या दिवसांत रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हाच या मंडळाचा हेतू आहे. हे प्रदर्शन 3 नोव्हेंबरपर्यंत मोफत पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे.
या प्रदर्शनात प्रसिध्द चित्रकार सुनील परदेशी यांनी इंदिरा गांधी, किसन खंडोरी यांनी जोगवा, राजेंद्र दगडे यांनी रतन टाटा, सविता शेलवले यांनी आनंद दिघे, आलिशा जैन यांनी सूर्यकुमार यादव, मनोज चव्हाण यांनी रश्मिका मंदाना, प्रदीप घाडगे यांनी मनोज जरांगे, कुणाल साळवी यांनी अतुल परचुरे, प्रियांका भासे यांनी रोहित शर्मा, आशिष गायकवाड यांनी आलू अर्जुन, अमित कांबळे यांनी राज कुमार यांची रांगोळी साकारली असून नवोदित कलाकारांनीही विविध विषयावरील रांगोळ्या साकारून प्रदर्शनात जिवंत पणा आणला आहे.
रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन छत्रपती शिवाजी मंडळाच्या सभागृहात करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष गजानन गुरव यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे, दत्तात्रय म्हसे, प्रदीप तथा बाळा देशमुख, हरिश्चंद्र राऊत तसेच तन्हा परदेशी, मनोज देशमुख, मानसी सुळे, वैदेही दगडे, गौरी चव्हाण, शर्वरी भोसले, सलोनी जैन, गार्गी साळुंखे, शुभम पॉल आदी नवोदित कलाकार उपस्थित होते.