। उरण । प्रतिनिधी ।
उरण विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना महाराष्ट्र मच्छिमार सेनेने पाठिंबा दिला आहे. तसे पत्र त्यांनी जे. एम. म्हात्रे यांना दिले आहे.
कोळी बांधवांच्या अनुसूचित जमातीचे दाखले, वैधता प्रमाणपत्र, मत्स्य व्यवसायास उर्जित अवस्था आणण्यासाठी सकारात्मक धोरण, जलप्रदूषण, कोळीवाड्यांचे गावठाण, सीमांकन, मच्छी मार्केटचे आधुनिकीकरण, रोजगार स्वयंरोजगारासाठी स्थानिक भूमिपुत्र म्हणून प्रथम प्राधान्य देणे, सुसज्ज बंदरे, शीतगृहे, डीजल परतावा, कोळीवाड्यातील रस्ते, पाणी, आरोग्य विषयक मूलभूत गरजा तसेच आई एकविरा देवस्थान ट्रस्ट वेहेरगाव या शासकीय संस्थेवर रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व, सागरी किनारपट्टीवर होणार्या प्रकल्पासंदर्भात स्थानिक भूमिपुत्रांचा जनमताचा आदर करणे आणि कोळी जमातीच्या सर्वांगीण हिताच्या मागण्या संदर्भात सकारात्मक ठोस अभिवचन मिळाल्यामुळे विधानसभा क्षेत्रातील कोळी समाज बांधव, महाराष्ट्र मच्छीमार सेनेच्यावतीने प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी मुख्य संघटक मंगेश कोळी, संतोष पाटील, सिताराम नाखवा माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.