उद्धव ठाकरेंचा राणे घराण्यावर हल्लाबोल
। कणकवली । वृत्तसंस्था ।
आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणार्या मोदींना सिंधुदुर्गातील राणेंची घराणेशाही दिसत नाही का?, असा सवाल करून महाराष्ट्र लुटून गुजरातचा विकास करणार्या भाजपला सिंधुदुर्गातील बाप-लेकांसह काहीजण साथ देत आहेत.
इथली पाणबुडी गुजरातला गेली तरीही ते गप्प राहिले. अशा महाराष्ट्रद्रोही बाप-लेकांना सिंधुदुर्गात थारा देऊ नका, असे आवाहन शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीतील सभेत केले. सावंतवाडीत त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर कडाडून टीका केली. सावंतवाडीचे राजन तेली, कणकवलीचे संदेश पारकर आणि कुडाळ-मालवणचे वैभव नाईक या महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ठाकरे यांच्या प्रचारसभा झाल्या. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर कडाडून टीका केली.
कणकवली येथील सभेत ठाकरे म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास थांबविला, अशी टीका गृहमंत्री शहा करत आहेत. आम्ही विकास थांबविला नव्हता तर महाराष्ट्रातून गुजरातला जाणारे उद्योग थांबविले होते; पण आमचे सरकार जाताच मिंधे गटाने भाजपशी हातमिळवणी करून इथले उद्योग गुजरातला नेण्याचा सपाटा लावला. सिंधुदुर्गात होणारा पाणबुडी प्रकल्पदेखील राज्य सरकारने गुजरातला जाऊ दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर घणाघाती टीका करत होते; पण सिंधुदुर्गात काय चाललंय? बापाला डोक्यावर तर दोन मुलांना खांद्यावर बसवलं जातंय. ही घराणेशाही नाही तर काय आहे? तुम्हाला ठाकरेंची घराणेशाही दिसतेय तर इथली का दिसत नाही? राणेंच्या रस्ता अडविण्याच्या आव्हानाला मी फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट करत आमचा रस्ता अडवायला आधी रस्ते तर नीट करा, असा टोलादेखील ठाकरे यांनी लगावला.