। नागोठणे । वार्ताहर ।
विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार 85 वर्ष व त्यावरील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांसाठी गृह मतदान मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नागोठणे शहरातील 10 मतदान केंद्रात नाव समाविष्ट असलेल्या वयोवृद्ध मतदारांचे मतदान पत्रिकेद्वारे शुक्रवारी (दि.15) मतदान घेण्यात आले.
नागोठणे शहरात घेण्यात आलेल्या गृहमतदान प्रक्रियेसाठी एकूण 16 मतदार होते. त्यापैकी 15 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेच्या पेण मतदार संघातील पथक क्रमांक 18 ने नागोठण्यातील वयोवृद्ध मतदारांच्या घरोघरी जाऊन हे गृहमतदान घेतले. यावेळी रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तथा झोनल ऑफिसर शुभदा पाटील-कुलकर्णी, नागोठणे तलाठी तथा मतदान केंद्राध्यक्ष गणेश विटेकर, नागोठणे ग्रामविकास अधिकारी तथा सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष राकेश टेमघरे, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी किसन शिर्के, भास्कर घाग व पथकातील इतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून नागोठण्यातील गृहमतदान प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली.