प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
| अलिबाग | वार्ताहर |
मागील पाच वर्षांत अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या विद्यमान आमदारांनी थळ जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही, याठिकाणी फक्त दहशत निर्माण केली आहे. ती दहशत कायमची मोडून काढणार अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई आ. दळवींचा जोरदार समाचार घेतला. या भागातील कोळी, आगरी व इतर समाजातील मतदारांच्या समस्यांवर विधानसभेत कोणताच प्रश्न उपस्थित केला नाही. तुम्ही मला भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर तुमचे सर्व प्रश्न मी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही थळ येथील शनिवारी (दि. 16) संध्याकाळी प्रचार सभेला संबोधित करताना चित्रलेखा पाटील यांनी दिली.
यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, विद्यमान आमदार मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या व विकासकामे करण्यात निष्क्रिय ठरले आहेत. त्यांनी रस्ते, पाणी आदी महत्त्वाच्या विकासकामांबाबत दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही, त्यांनी तुमच्यासह महाराष्ट्राची फसवणूक केली आहे. आपल्या महाराष्ट्राचे 50 खोके घेऊन गुवाहाटीला गेले, महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पाठवले, यामुळे आज आपला तरुणवर्ग बेरोजगार झाला आहे. आरडीसीसी बँकेमध्ये होत असलेल्या तरुणांच्या भरतीला या लोकांनी स्थगिती आणली आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या म्हणजेच तुमच्या चिऊताईला तीन नंबरच्या शिट्टी निशाणीसमोरील बटण दाबून मला विजयी करा, तुमच्या सर्व अडचणी व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी थळ जिल्हा परिषद मतदारसंघातील कामार्ले, जांभुळपाडा, नवगाव, थळ, वरसोली, मानी भुते येथे झालेल्या प्रचार रॅली व प्रचार सभेत मतदारांचा व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये शिट्टीचा नाद घुमत होता. या भागातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील सभेत महिलांसह पुरुषवर्गाची संख्या लक्षणीय होती.
या सभेला परशुराम म्हात्रे, राम म्हात्रे, मान तर्फे झिराड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश पाटील, जयेश पाटील, माजी सरपंच विठोबा पाटील, सुरेश सहाणकर, माजी सदस्य सतीश म्हात्रे, शैलेश घरत, आरकेश नाईक, सौरभ म्हात्रे, सदस्या सुजाता म्हात्रे, दिपक म्हात्रे, विवेक म्हात्रे, सतीश म्हात्रे, मनोहर म्हात्रे, सुनील म्हात्रे तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शेकाप पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.