। मुरुड जंजिरा । प्रतिनिधी ।
रायगडात माकडांनी मोठा उच्छाद मांडला आहे. या माकडांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आंबा, काजू बागांसह फळपिकांचे नुकसान करणार्या माकडांना पकडण्याची मोहीम आंबा हंगाम सुरू होण्याआधी करण्यात येणे गरजेचे आहे.
रायगडात मुरुड, रोहा, श्रीवर्धन, दांडगुरी, खारआंबोळी परिसरातील बागायतदार व शेतकरी माकडांच्या त्रासाला कंटाळले आहेत. मुरुडमध्ये नारळाच्या झाडाला कोंब फुटून छोटे नारळ बाहेर येताच माकडे खातात. त्यामुळे नारळ मोठा होत नसल्याने नुकसात होत आहे. येणार्या थंडीत आंब्याला मोहर येणार आहे. त्यानंतर आंबा कैरी रूपात असताना माकडाचे वादळ आले तर आंब्याचे पीक नष्ट होईल. त्यासाठी वनखात्याने आताच उपाययोजना करावी अशी मागणी बागायतदार करत आहेत.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंबा आणि काजू याबरोबर इतर फळांचे उत्पन्न घेतले जाते. याबरोबर भाजीपाला व भात शेती कोकणात केली जाते. मात्र गेली काही वर्ष फळबागा आणि शेतीपिकांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाला आहे. दरवर्षी त्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी दांडगुरीचे आदर्श शेतकरी शरद खेडेकर यांनी वनखात्यात अनेक वेळा तक्रार करूनही वनखात्याकडून कारवाई होताना दिसत नाही. बागायतदारांनी माकड, वानरांपासून होणार्या उपद्रवाबद्दल आवाज उठवण्याची गरज आहे. वनखात्याने माकडांच्या उपद्रवासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.मुरुड शहरात बाजारपेठेत रोज सकाळी सात वाजता घरच्या छपरावर वीस पंचवीस माकडे असतात एक झाडावरून दुसर्या झाडावर उड्या मारत कर्कश आवाज करत व घराची खिडकी उघडी असली तर घरातील खाण्याच्या वस्तू उचलू खातात घरातील महिला लहान मुले भयभीत झाले आहेत. नागरिकांना दरवाजे बंद करून घरी बसावे लागत आहे.