। रायगड । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात अधिकाधिक आदिवासी लोकवस्ती असून, ग्रामीण भागात ती विखुरली आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या भागात जंगल परिसर अधिक असल्याने हंगामानुसार उपलब्ध होणार्या रानमेव्यापासून येथील नागरिक गुजराण करत असतात. मात्र, अचानक वणवे लागून जंगले नष्ट होत असल्याने वनसंपत्ती र्हास होण्याच्या मार्गावर आहे.
दरवर्षी डोंगर व जंगलात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गवत, झाडेझुडपे, वेलवर्गीय वनस्पती उगवत असतात. पावसाळा संपल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांच्या दरम्यान या उगवलेल्या गवत व इतर वनस्पती वाळू लागतात. यादरम्यान डोंगर, जंगलातील मोठ्या झाडांचा वाळलेला पाला जमिनीवर पडलेला असतो.
याच वाळलेले गवत व इतर वनस्पती; तसेच पालापाचोळ्याला अनेकदा वणवे लावण्याचे प्रकार काहींकडून लावले जातात. अनेकदा गैरसमजुतीनेही वणवे लावले जातात. या वणव्यामध्ये अनेकदा संपूर्ण डोंगरच्या डोंगर, जंगले जळून खाक होऊन निसर्गाचा र्हास मोठ्या प्रमाणावर होतो. यात वनसंपदा नष्ट होतात. अनेकदा पशू-पक्षी, वन्यप्राणी होरपळून निघतात. त्यामुळे वणवे नियंत्रणासाठी आत्तापासूनच वन विभागाकडून जनजागृती; तसेच वन वणवा याविषयी मार्गदर्शन करणार्या कार्यशाळा घेण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. गवत, पालापाचोळा जळून गेल्यामुळे पाऊस पडला तरी पावसाचे पाणी डोंगररांगांत साचले जात नाही. ते थेट नदीकडे वाहत असते. त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. काही अंशी याचा परिणाम भूगर्भातील जलस्रोतांवर होत आहे.
गावागावांत निसर्गमित्र तयार करावेत. वणवा विषयावर पथनाट्य सादरीकरण व्हावे. जनजागृतीत शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. वणवे नियंत्रणासाठी सामाजिक संस्थांना सोबत घ्यावे. वणव्याविषयीच्या ज्येष्ठांच्या गैरसमजुती दूर कराव्यात. शक्य असेल तेथे जाळपट्टे काढावेत.