चरी ग्रामपंचायतीच्या सरपंचांची मागणी
| पेण | प्रतिनिधी |
शेतकर्यांच्या चरीच्या संपाच्या 91 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंधेला चरी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत पाटील यांनी भविष्यात शासनाकडून योग्य कार्यवाही करुन 27 नोव्हेंबर या दिवशी जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
ते म्हणाले की, जागतिक इतिहासात ज्या चरीच्या संपाचा उल्लेख आहे आणि तो एकमेव संप तब्बल सात वर्षे शेतकर्यांनी कै.ना.ना. पाटील यांच्या नेतृत्वाने सुरू ठेवून यशस्वी केला. त्या शेतकरी संपाच्या आठवणी आता कुठे तरी लोप पावू लागल्या आहेत. म्हणूनच मी चरी गावचा सरपंच या नात्याने जिल्हा प्रशासनाला आवाहन करीत आहे की, शासनाकडून आपण योग्य ती कार्यवाही करून 27 नोव्हेंबर या दिवशी रायगड जिल्ह्यात सार्वत्रिक सुट्टी जाहीर करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आणि महानिर्वाणदिनी सुट्टी जाहीर असल्याने लाखो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीत जातात त्याचप्रमाणे जर 27 नोव्हेंबरला चरीच्या शेतकरी संपाचा स्मृतीदिन म्हणून जिल्हा प्रशासनाने सुट्टी दिल्यास रायगड जिल्ह्यातील शेतकरी व शेतकर्यांची मुले एक दिवस तरी का होईना चरीच्या ऐतिहासिक भूमीत येऊन नतमस्तक होतील. तरी जिल्हा प्रशासनाने माझ्या मागणीचा योग्य विचार करावा, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.