घंटागाडी न आल्यास प्रशासनाकडे तक्रार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून घरोघरी सर्वेक्षण करून घराच्या दारावर बारकोड लावण्याचे काम सध्या पनवेल पालिका हद्दीत सुरु आहे.दारात दररोज घंटागाडी येते की नाही? दररोज प्रत्येक प्रभागात स्वच्छता होते की नाही? हेदेखील यामुळे प्रशासनाला कळणार असून, जर घंटागाडी आली नाही तर घरावर बसवलेला बारकोड स्कॅन करून नागरिक मोबाइलद्वारे थेट पालिका प्रशासनाकडे तक्रार करू शकणार आहेत. शहर स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरू शकणारे हे बारकोड नागरिकांनी घरावर व दुकानावर बसवून घ्यावे व पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले जात आहे.
घंटागाडी प्रत्येकाच्या घराजवळ पोहोचावी, शहर स्वच्छतेत कोणतीही कसर राहू नये, हा यामागचा हेतू आहे. पनवेल शहरात या योजनेचा शुभारंभ झाला असून, येत्या काही दिवसात पालिका हद्दीतील प्रत्येक घरावर, दुकानावर अगदी शाळा व दवाखान्यावर, सार्वजनिक शौचालयावरदेखील हे बारकोड बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्रत्येक घर, शाळा, दवाखाना, दुकान, हॉटेल्स यांना एक विशिष्ट क्रमांक प्राप्त होणार आहे. घंटागाडी कर्मचारी प्रत्येक प्रभागात, प्रत्येक घराजवळ जाऊन संबंधित बारकोड स्कॅन करून मगच त्या ठिकाणचा ओला व सुका कचरा घेऊन घंटागाडीत टाकणार आहेत. या बारकोडमुळे घंटागाडी दारोदारी पोहोचू शकेल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
सद्यःस्थितीत प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सीचे कर्मचारी पनवेल शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून बारकोड बसवण्याचे काम करत आहेत. पनवेल शहारानंतर इतरही भागात हे काम सुरु होणार आहे.