आदिती तटकरेंकडून महेंद्र थोरवेंचा समाचार
| श्रीवर्धन | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात धुसफूस सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी गद्दारी केली, तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर अशी टीका केली होती. या टीकेला आदिती तटकरे यांनी थोरवे यांचा जोरदार समाचार घेत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि पाय जमिनीवर ठेवा, असा खोचक सल्लाही आदिती तटकरे यांनी थोरवेंना दिला आहे.
आदिती तटकरे विधानसभा निकालानंतर रोहेकरांच्या भेटीला आल्या होत्या. यावेळी त्यांनी महेंद्र थोरवेंवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या की, कर्जत खालापूर आमदार हे महेंद्र थोरवे काठावर उत्तीर्ण होऊन वाचले. ते फार मोठे नसल्याने त्यांना मी त्यांना फारसे महत्त्व देत नाही. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा आणि महायुतीच्या माध्यमातून विकास काम करावे. कुठलेही यश मिळाले असले तरी पाय जमिनीवर ठेवून राहावे किंवा मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नये. यश नम्रतेने स्वीकारायचा हवे. मी 82 ते 83 हजार मताधिक्याने निवडून आली आहे. पण या यशाचा स्वीकार आम्ही नम्रतेने करत आहोत. निवडणुकीत अथवा जीवनात मिळालेले यश किती डोक्यात जाऊ द्यायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे. राज्यात आता महायुतीचे सरकार येत आहे. आमच्या पक्षातून कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील, स्थानिक आमदार हे ठरवत नाही, असं प्रत्युत्तर आ. आदिती तटकरे दिले.