शेकाप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाने गोरगरीबांशी बांधिलकी जपली आहे. त्या दृष्टीकोनातून आपण आजपर्यंत निष्ठेने काम केले आहे. या निवडणुकीत महिला, तरुण मंडळी अशा सर्वच कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले. रात्रीचा दिवस करून कष्ट घेतले. कार्यकर्त्यांची ही मेहनत कधीच वाया जाणार नाही. आगामी काळात नगरपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लढायचे आहे. उद्याचा उगवता सूर्य आपलाच असणार आहे. आपले वैभव पुन्हा उभे करू, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बुधवारी (दि.27) बैठक अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते द्वारकानाथ नाईक, अॅड. गौतम पाटील, शैला पाटील, वामन चुनेकर आदींसह अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाने पुरोगामी विचार तेवत ठेवण्याचे काम केले आहे. प्रवाहाच्या विरोधात लढत गोरगरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांना रोजगार दिला आहे. अॅड. दत्ता पाटील हे त्यावेळी शेकापचे एकमेव आमदार होते. त्यानंतर पक्षाच्या आमदारांमध्ये वाढ झाली. एका वेगळ्या भूमिकेतून काम केले आहे. शेकाप हा संघर्षातून, चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे कधीही खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने कार्यकर्त्यांनी उभे राहून काम करायचे आहे. या निवडणुकीत आपली मते कुठेही कमी झाली नाहीत. ती कायम राहिली आहेत. फक्त 15 हजार मते आपल्याला कमी पडली आहेत. ती मते आगामी काळात भरून काढण्याची ताकद आपल्याकडे आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
ज्यांना आपण मोठे केले, नको त्यांना अधिकार दिले, त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत वेगळ्या भूमिकेतून लढायचे आहे. आपली बांधिलकी, परंपरा गोरगरीबांसोबत आहे. पुढच्या वेळेला आपण विजय खेचून आणू. चित्रलेखा पाटील यांच्या रुपाने एक सक्षम नेतृत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी महिलांची आघाडी निर्माण करून एक वेगळी छाप निर्माण केली आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली ताकद पुन्हा निर्माण करायची आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
पुन्हा उमेदीने उभे राहू : चित्रलेखा पाटील
विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्वांनी निःस्वार्थीपणे काम केले. या निवडणुकीत जरी पराभव झाला असला, तरीही कोणीही कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून आपली ताकद निर्माण करू, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत मोठी संधी दिली. लाल झेंड्याने व समस्त कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, तो कधीही विसरू शकत नाही. सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला कसलीही भीती वाटत नाही. गद्दारांनी विरोधकांचे काम केले. त्यांची भांडी घासण्यासाठी गेले, त्यांना जाऊ द्या, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना अशी त्यांची अवस्था झाली आहे. पक्षाने गद्दारांना मानसन्मान, प्रेम दिले. आपण वेगळी भूमिका घेऊन पक्षाची बांधणी करणार आहोत. केंद्रस्तरावर मते वाढविण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आता बदला घ्यायचा : अॅड. मानसी म्हात्रे
या निवडणुकीत मतदारांसह कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.चिऊताईला निवडून देण्यासाठी सर्वांनी चांगली मेहनत घेतली. चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई झाशीच्या राणीसारख्या लढल्या. या निवडणुकीच्या मैदानात खंदे कार्यकर्ते खंबीरपणे उभे होते. परंतु, काही गद्दारांनी पाठून वार केला. विरोधकांनी कट कारस्थान करून मते फिरविण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात त्याचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी पक्षाने कात टाकण्याची गरज आहे, असे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे म्हणाल्या.
पुन्हा उमेदीने भरारी घेऊ : अॅड. गौतम पाटील
शेतकरी कामगार पक्षाने चित्रलेखा पाटील यांच्या रुपाने चांगला उमेदवार दिला.गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक काम केले आहे. त्यांचे समाजकार्य घराघरात पोहोचले आहे. त्यांच्या उमेदवारीने कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले होते. महिला वर्गदेखील काम करत होते. या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी 84 हजार मतदार उभे राहिले. कार्यकर्त्यांनीदेखील प्रचंड कष्ट घेतले. परंतु, खचून न जाता पुन्हा उमेदीने भरारी घेऊ या. शेकाप हा लढवय्या, चळवळीचा आणि आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. चित्रलेखा पाटील, नृपाल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या, असे आवाहन अॅड. गौतम पाटील यांनी केले.
चिऊताई झाल्या भावूक
निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी चांगली साथ दिली. दिवसरात्र अपार मेहनत घेतली. निकाल येतील जातील, आपले प्रेम, आपले ॠणानुबंध कायम राहतील. महिला व तरुण नेतृत्व म्हणून या निवडणुकीत उमेदवारीची संधी पक्षाने दिली. परंतु, गद्दारांमुळे पराजय झाला. हे बोलत असताना अचानक चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचे डोळे पाणावले. काही वेळासाठी त्या स्तभ झाल्या. त्या भावूक झाल्याचे लक्षात येताच असंख्य कार्यकर्त्यांनी ‘चिऊताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.