| जालना | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री कोणीही होवो, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही, परंतु मराठ्यांची एकजूट सरकारचा घाम फोडणारी आहे, कोणीही आले तरी आम्हाला सुख नव्हते, आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, यावेळी मी आणि माझा समाज मैदानात नव्हतो, माझ्या समाजाने जे करायचे, ते केले आहे, माझ्या समाजाशिवाय राज्यात कोणाचीच सत्ता येऊ शकत नाही. मराठा समाज ताकदीने प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिला आहे, आता सरकारने मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरक्षण मिळवून द्यावे, मस्तीत येऊ नये. आजकालचे सरकार भावनाशून्य आहे, त्यांना भावनेची किंमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबतीत काम केले आहे, पण आम्हाला पण लढावे लागले होते.
मराठ्यांना महाविकास आघडी आणि महायुतीकडून सहजासहजी काहीही मिळालेले नाही. मुख्यमंत्री हे आरक्षणाबाबत काम करू शकले, आरक्षण मिळवून देऊ लागले, पण सत्य हे आहे की, आम्हाला सहजासहजी काही मिळाले नाही. परंतु, मुख्यमंत्री कोणाला करायचे हा त्यांचा विषय आहे. आम्ही आमच्या आमरण उपोषणाच्या तयारीला लागलो आहोत. 132 पेक्षा जास्त मतदारसंघांत 20 हजारांच्या आसपास महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत, तिथे मराठ्यांनी सभा लावली असती तर पूर्ण राख झाली असती. महायुती जास्त मतांनी निवडून आली म्हणजे आता तुमची जबाबदारी वाढली आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.