वाहतूक करणारी गाडी जप्त
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत जनावरांची तस्करी करून त्यांना कत्तल करण्यासाठी विक्री केली जात असल्याचे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमुळे पाच गोवंशीय जनावरांची सुटका झाली आहे. डामसेवाडी येथील कातकरीवाडीमधून ग्रामस्थांनी आपल्या भागातील जनावरांची यशस्वी मुक्तता केली असून ती जनावरे आणि गाडी येथेच टाकून गाडी चालकाने पळ काढला आहे. दरम्यान, त्या पाच जनावरांची सुटका झाली असून पिकअप गाडीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
कर्जत तालुक्यातील ठाणे जिल्हा हद्दीला लागून असलेल्या गावातील आणि आदिवासी पाड्यांमधील जनावरांची तस्करी हे तेथील शेतकर्यांसाठी मोठे संकट आहे. त्या भागातून मागील काही वर्षात असंख्य गोवंशीय जनावरांची तस्करी झाली आहे. घराच्या बाहेर गोठ्यात बांधलेली जनावरेदेखील चोरून तस्करीसाठी नेली जात असल्याचे उघड झाले आहे. वर्षभर जनावरे पळवून नेण्याचे प्रकार सुरू असतात.
त्यामुळे नेरळ पोलिसांनी ठाणे जिल्ह्याचे हद्दीवर सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे बसवले आहे. तरीदेखील अनेक वाटा शोधून जनावरांची तस्करी केली जात आहे. ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या भागातील भीमाशंकर नांदगाव रस्त्यावरून एक पीकअप गाडी जात असल्याचे स्थानिकांनी पाहिले. दुपारच्या सुमारास पिकअप गाडीला छप्पर टाकून संशयीतरीत्या वाहतूक सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये पाच गोवंशिय जनावरांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी त्या जनावरांबद्दल चौकशी करण्याचा प्रयत्न त्या गाडी चालकाकडे करण्यास सुरुवात केली असता गाडी चालक गाडी टाकून पळून गेला. ग्रामस्थांनी समयसुचकता दाखवून ताब्यात घेतलेल्या पिकअपमध्ये साधारण अडीच लाख रुपये किंमतीची जनावरे बांधून ठेवली होती.
त्या पिकअप गाडीमध्ये जनावरांना दाटीवाटीने भरुन ठेवले होते. तसेच त्या जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. पोलिसांनी पाहणी केली असता त्या जनावरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय तपासणी पासदेखील नव्हता. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शन घेवून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक वसावे हे करीत आहेत.