सूत्रांकडून मिळाली माहिती, पोलीस प्रशासनाची टाळाटाळ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठलेला असताना अलिबाग तालुक्यात मात्र खुलेआम रस्त्यावरच डिझेलची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. या तस्करीमुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून, जिल्ह्यात डिझेल तस्करीचे रॅकेट सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे, आमदारांच्या गावातही खुलेआम तस्करी होत असल्याने आमदारांचे त्या सोबत कनेक्शन असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
सध्या डिझेलचा भाव 90 रुपयांवर पोहोचला आहे. या पंपावरील डिझेलपेक्षा तस्करी केलेले डिझेल कमी दराने विकले जात आहे. त्यामुळे एका लीटरमागे जवळपास 30 ते 35 रुपयांपर्यंत फायदा होतो. त्यामुळे अवजड वाहनांचे चालक तसेच बोट मालक या डिझेलला पसंती देतात. मुंबई बंदरात येणार्या मोठ मोठ्या जहाजांना भरसमुद्रात थांबवून त्यातील डिझेल लुटले जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. जहाजातून लुटून आणलेले डिझेल येथील स्थानिक मच्छिमार, ट्रकचालक यांना विकतात आणि त्यातून पैसे कमावतात. डिझेल तस्करीच्या या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. डिझेल तसकरी करणारे तस्कर समुद्रामध्ये व खाडीमध्ये मच्छिमार करणार्या मोठ्या बोटमालकांना कमी भावाने डिझेल देत आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छिमारी सोसायटीचे डिझेल कोणी घेत नसून, सोसायटी नुकसानात आहे व शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. तरी या डिझेल तस्कराच्या टोळीवर कारवाई करत आपल्या कार्यालयामार्फत त्यांचे जामीन रद्द व्हावे व यांच्यावर कठोरात काठोर कार्यवाही करण्याबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी, कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्या अधिकार्यांवरही कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
चाळमळ्यात डिझेल तस्करी
अलिबाग तालुक्यातील चाळमळा येथे शनिवार व रविवारी रात्री डिझेल तस्करी होत असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आमदारांच्या गावात होणार्या या तस्करीवर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
कमी दरात डिझेल विकण्याचा गोरखधंदा
डिझेल तस्करीचा गोरखधंदा चालविणार्या राजू पंडितसह गणेश कोळी पोलिसांच्या हिटलीस्टवर आहेत. राजू पंडित असे डिझेलमाफियांचे नाव आहे. हा मुंबईचा रहिवासी असून, अरबी समुद्रातील डिझेल तस्करीचा माफिया म्हणून ओळखला जातो. परदेशातून तसेच भारतीय जहाज मुंबईमध्ये येत असताना, त्यांच्या कॅप्टन अथवा अन्य व्यक्तींशी हातमिळवणी करुन कमी भावाने त्यांच्याकडून डिझेल घेऊन मासेमारी करणार्या बोटींना ते कमी दरात विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. यातून दिवसाला लाखो-करोडो रुपयांची उलाढाल केली जाते. या बोटी मुंबई, रेवस, बोडणी, रेवदंडा, अलिबाग या ठिकाणातील आहेत. या बोटींना बाजारभावापेक्षा 30 ते 35 रुपयांपेक्षा कमी म्हणजे 65 रुपये किमतीने डिझेल विकले जाते. विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या कृपेने हे धंदे सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.