| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील 22 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करीत असतानाचे तिच्या नकळत मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, याबाबत पीडितेच्या कुटुंबाकडून नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तरुणाविरोधात बाललैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गावातील आरोपी तरुण अक्षय दशरथ ऍनकर या तरुणाने पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार केला आहे. तर पीडित मुलीसोबत अक्षयने सुरुवातीला प्रेमाचे नाटक करीत तिला तुझे वय 18 वर्षे पूर्ण झाले की आपण लग्न करू, असे अमिष दाखवले होते. दरम्यान, गेली दोन वर्षे पीडित तरुणी सोबत प्रेमाचे नाटक करीत असताना आरोपी अक्षय याने पीडित मुलीला मार्च 2023 मध्ये आपल्या घरी तसेच शेजारील बंद घरात कोणीही नसताना सुरुवातीला भेटण्यासाठी बोलवले होते. अक्षय हा शारीरिक सबंधासाठी पीडित मुलीला धमकावत तू माझ्यासोबत शरीरसंबंध केले नाहीत तर तुझ्या आई वडिलांना मी ठार मारीन अशी धमकी देत होता. घाबरून गेलेल्या युवतीसमवेत अत्याचार करीत असताना आरोपी अक्षय याने आपल्या मोबाईलमध्ये पीडित मुलीच्या नकळत व्हिडिओ रेकॉर्ड देखील केले होते. तेच व्हिडीओ अक्षय याने आपल्या मोबाईलमधून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने ही बाब समोर आली. पीडित मुलीच्या कुटुंबाकडून नेरळ पोलिस ठाण्यात धाव घेत अक्षय यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.