। काबूल । वृत्तसंस्था ।
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ज्युनिअर महिला राष्ट्रीय व्हॉलीबील संघाच्या खेळाडूचा शिरच्छेद केला आहे. संघाच्या प्रशिक्षकाने ही माहिती दिली आहे. प्रशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, महजबीन हकिमी नावाच्या खेळाडूची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर कुटुंबाला धमकावण्यात आलं होतं. यामुळे हत्येची माहिती समोर आली नव्हती.
अफगाणिस्तानात सत्तांतर होऊन तालिबान्यांची सत्ता येण्याआधी महजबीन काबुल नगरपालिका व्हॉलीबॉल क्लबसाठी खेळत होती. महजबीन संघाच्या स्टार खेळाडूंपैकी एक होती. काही दिवसांपूर्वी शिरच्छेद केलेल्या महजबीनच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये तिचं मुंडकं आणि रक्तबंबाळ मान दिसत होती.