। पुणे । प्रतिनिधी ।
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावर दरोडा टाकून देवीचे दागिने, पान आणि मुखवटा असा लाखो रुपयांचा ऐवज लुटणारी टोळीला नगर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडून एकूण 26 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रविवारी (दि. 9) रात्री अज्ञात चोरट्यांनी संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे सोन्याचे दागिने, मुकुट आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन तपासासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सुयोग दवंगे हा या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याची तसेच, तो आणि त्याचा साथीदार सचिन मंडलिक चोरीचा ऐवज विक्रीसाठी लोणीमार्गे अहिल्यानगरला जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हार-लोणी रस्त्यावर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पकडलेले आरोपी हे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्याकडून 26 लाख 12 हजार 900 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सुयोग अशोक दवंगे (21), सचिन दामोदर मंडलिक (29, रा. संगमनेर), संदीप किसन साबळे (23, रा. पाचपट्टा, ता. अकोले), संदीप निवृत्ती गोडे (23, रा. सोमाटणे, ता. अकोले), अनिकेत अनिल कदम (21), दीपक विलास पाटेकर (24, दोघेही रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.