चिरनेरच्या शेतकर्यांना ड्रमचे वाटप
| चिरनेर | प्रतिनिधी |
सेंद्रिय शेतीमध्ये मातीची गुणवत्ता सुधारते. सेंद्रिय शेतीमध्ये शाश्वतता, मातीची सुपीकता व जैवविविधता वाढविण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निसर्गमित्र नैसर्गिक शेती गट, विकास नैसर्गिक शेती गट व प्रगती नैसर्गिक शेती गटांना कृषी विभाग उरणमार्फत चिरनेर-उरण येथे शेतकर्यांना जीवामृत, बीजामृत व दशपर्णी अर्क तयार करण्याकरिता तहसीलदार डॉ. उद्धव कदम, तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ-नारनवर, सरपंच भास्कर मोकल, शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, पोलीस पाटील संजय पाटील यांच्या हस्ते 200 लीटरच्या ड्रमचे वाटप करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव कदम बोलत होते.
उरण तालुक्यात कृषी विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत 500.00 हेक्टर क्षेत्रावर 36 गटांची स्थापना करण्यात आली आहे. या 36 गटांना सेंद्रिय निविष्ठा म्हणजे जीवामृत, बीजामृत व दशपर्णी अर्क घरच्या घरी तयार करता यावेत यासाठी कृषी विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबविणे, जमिनीची सुपीकता वाढविणे व आरोग्य सुधारणे, तसेच सेंद्रिय मालाची उत्पादन व विक्री करुन ग्राहकांना रसायनमुक्त धान्य देणे हा प्रमुख उद्देश आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याकरिता उरण तालुक्यात 36 गटांना ड्रम खरेदी न करता कृषी विभागामार्फत अर्थसहाय्य प्राप्त झाले असून, तालुक्यातील जवळपास 750 ते 800 शेतकर्यांना घरीच सेंद्रिय निविष्ठा तयार करणे शक्य होणार आहे. तसेच शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात निविष्ठा खरेदीमध्ये बचत होणार असून, गटातील सर्व शेतकर्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेला सहकार्य करुन जास्तीत जास्त शेतकर्यांनी सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ-नारनवर यांनी केले आहे. यावेळी उरण पंचायत समितीच्या कृषी अधिकारी श्रीमती जाधव, कृषी अधिकारी एस.डी. गटकळ, कृषी अधिकारी बी.डी. धेंडे, कृषी सहाय्यक अधिकारी सूरज घरत, बी.टी.एम. नमिता वाकळे तसेच चिरनेर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.