| चणेरा | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर निरनिराळ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी होत आहे. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय दंडाधिकारी रोहा ज्ञानेश्वर खुटवड यांच्या संकल्पनेतून न्हावे, सोनखार, नवखार व दीव येथील बिगर आदिवासी शेतकर्यांच्या अधिकार अभिलेखातील 36 व 36 अ चे शेरे कमी करून शेतकर्यांना सातबारा वितरित करण्यात आले. तसेच, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत मयत खातेदारांची नावे कमी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याप्रमाणे उपस्थित ग्रामस्थांच्या निरनिराळ्या शंकांचे निरसन उपविभागीय दंडाधिकारी यांनी आपल्या अभ्यासपूर्व मार्गदर्शनातून केले. त्याप्रमाणे रोहा तालुक्यातील कुंडलिका खाडी लगत दोन्हीकडे असणार्या ग्रामपंचायतीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी खुटवल यांनी सूचित केले आहे.
या कार्यक्रमाकरिता महसूल नायब तहसीलदार रोहा पुंडलिक मोकल, चणेरा मंडळ अधिकारी प्रकाश मोकल, ग्राम महसूल अधिकारी नंदकुमार पाटील, कृष्णा बारड, रुपेश वाडकर, ग्राम विकास अधिकारी, न्हावे ग्रामपंचायत सरपंच नितीन डबीर व सदस्य, ग्राम पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक दिपक वारघे यांनी केले.