पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावातील मुख्य बाजारपेठेत दुकाने फोडून चोरी करण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, एकाच रात्री पाच दुकाने फोडण्यात आल्याने पोलिसांच्या कार्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन मेडिकल स्टोर, एक चपल बुटाचे आणि एक बियर शॉपी अशी पाच दुकाने फोडली आहेत.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री नेरळ बाजारपेठ भागातील चार दुकाने फोडून किरकोळ चोरी केली. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरळ बाजारपेठेतील अंबिका नाका आणि जुनी बाजार पेठ येथील चार दुकान फोडून रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल अशी सुमारे 35 हजार रूपयांची रोकड लंपास केली.
दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास माथेरान-नेरळ रस्त्यावरील तीन तर जुने बाजारपेठ भागातील एक अशी चार आणि नेरळ एसटी स्टँड भागातील एक मेडिकल स्टोअरमध्ये चोरीची घटना घडली. अंबिका भुवन नाक्याजवळील एमआरटी कॉम्प्लेक्समधील एका रांगेतील तीन दुकानांचा समावेश आहे. त्यात न्यू राज नावाचे वाईन आणि बियर शॉपमधील गल्ल्यातील पाच हजार रुपयाची रोकड तसेच बियर आणि वाईनच्या बाटल्या आणि मोबाईल असा 25 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. जीएन शूज शॉपमधून 100 रूपयांची चिल्लर चोरून नेली, तसेच तेथील केक शॉपही फोडले.
नेरळमधील जुन्या बाजारपेठेतील डॉ. लाड यांच्या क्लिनिक समोरील अंबिका मेडिकल अँड जनरल स्टोअरमध्येही चोरी झाली असून, सहा हजार रुपये रोख आणि काही परफ्युम्स चोरून नेण्यात आले आहेत. या मेडिकल दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये या चोरीची घटना कैद झाली असून त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरु आहे. तसेच, या रात्रीमध्ये नेरळ पूर्व भागातील आणखी एका दुकानातही चोरी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.





