| बिहार | वृत्तसंस्था |
राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मोठा मुलगा माजी मंत्री तेज प्रताप यादव याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. तसेच त्यांना कुटुंबातूनही बेदखल केल्याचे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी या निर्णयामागची सविस्तर माहिती दिली.
बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्ये तसेच सार्वजनिक जीवनातील शिष्टाचारापासून विचलित झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे लालू प्रसाद यादव म्हणाले.
तेज प्रताप यादव यांनी शनिवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी अनुष्का यादव नामक महिलेशी प्रेमसंबंध असून 12 वर्षांपासून आपण एकत्र असल्याचा दावा केला होता. तसेच आता ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करत आहोत, असे ते फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले. पण काही वेळेतच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि एक्सवर दुसरी पोस्ट टाकत सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला.
लालू प्रसाद यादव यांनी अधिकृत एक्स हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक न्यायासाठी आम्ही करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. मोठा मुलगा ज्या प्रकारचे कृत्य करतो, लोकांशी त्याचे वागणे आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य आणि संस्काराच्या विरोधात आहे. त्याच्या वरील कृत्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर करत आहे. आता पक्ष आणि कुटुंबात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्याला पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकण्यात येत आहे.







