। पाटना । क्रीडा प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या धावपटूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांचा षटकार मारला आहे. स्पर्धेतील वेगवान धावपटूंचा मान महाराष्ट्राच्या आदित्य पिसाळने पटकविला आहे. त्याचबरोबर शौर्या अंबुरेने पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. महाराष्ट्राने आता 3 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे.
पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या शंभर मीटर शर्यतीत आदित्य पिसाळला सुवर्ण, तर रूद्र शिनीला कांस्यपदक मिळाले आहे. मुलींच्या गटात शौर्या अंबुरे हिने रौप्यपदकाची कमाई केली. तर, 400 मीटर शर्यतीत कशिश भगतने कांस्यपदक जिंकले असून मुलींच्या 1500 मीटर शर्यतीत जान्हवी हिरूडकर सुवर्ण धाव घेतली आहे. मुलांच्या 100 मीटर शर्यतीत महाराष्ट्राने दुहेरी धमाका केला. आदित्य पिसाळने 10.62 सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले, तर रूद्र शिनी याने 10.78 सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले आहे. नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील हे खेळाडू असून श्रीनिवास गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.
नागपूरच्या जानवी हिरूडकर हिने 1500 मीटर शर्यतीत 4 मिनिटे 35.69 सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. दिल्लीची माही 4 मिनिटे 42.89 सेंकद वेळेसह रौप्यपदकाची मानकरी ठरली, तर कर्नाटकच्या प्रणाथी हिने 4 मिनिटे 45.08 सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले आहे. मुलांच्या 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीमध्येही महाराष्ट्राने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. आदित्य पिसाळ, अर्जून् देशपांडे, रूद्रा शिंदे व सैफ चाफेकर यांनी महाराष्ट्रासाठी सोनेरी कामगिरी केली. त्याचबरोबर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळविलेल्या 15 वर्षीय शौर्या अंबुरे हिने मुलींच्या 100 मीटर शर्यतीत 12.02 सेंकद वेळेसह रौप्यपदकाची कमाई केली आहे. मुलींच्या 400 मीटर शर्यतीत नागपूरच्या कशिश भगत हिने 56.83 सेंकद वेळेसह महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले आहे.