5 सुवर्ण, 5 रौप्य, 2 कांस्य पदकाची कमाई
। नवी दिल्ली । क्रीडा प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक प्रकारात 5 सुवर्णपदकांसह एकूण 12 पदकांची लयलूट केली आहे.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये ओव्हर ऑल प्रकारात मुंबईची परिनाने मदनपोत्रा हिने 83.650 गुणांसह सुवर्ण जिंकले, तर मुंबईच्याच शुभश्री मोरे हिने 80.200 गुण घेत रौप्यपदक मिळवले आहे. दिल्लीच्या राचेल दीपच्या वाट्याला कांस्यपदक आले आहे. त्याचबरोबर हूप प्रकारातही परिना हिने बाजी मारली आहे. तिने दिल्लीच्या राचेलदीप (19.300) हिला मागे टाकून 21.050 गुण मिळवले आहेत. महाराष्ट्राची देवांगी पवार (18.725) कांस्यपदकाची मानकरी ठरली आहे. बॉल प्रकारात आपली सहकारी परिनाला मागे टाकून किमया कार्ले हिने 20.500 गुणांसह सुवर्ण आपल्या नावे केले आहे. परिनाने 20.150 गुण मिळवले. तर, दिल्लीच्या राचेलने कांस्यपदक पटकावले आहे.
क्लब प्रकारात मुंबईची शुभश्री मोरे अव्वल ठरली आहे. तिने 20.600 गुण घेत परिनाला मागे टाकले. परिनाने 19.750 गुणांची कमाई केली. हरियाणाच्या मिष्काने 19.500 गुणांसह कांस्यपदक पटकावले आहे. तर, रिबन प्रकारात बाजी मारत परिनाने स्पर्धेतील तिसर्या सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले. रिबनमध्ये तिने 20.650 गुण, तर रौप्यविजेत्या शुभश्री मोरेने 19.850 गुण घेतले आहेत.
रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णपदकांची लयलूट केली असतानाच आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक प्रकारामध्ये मात्र सुवर्णपदक हुकले आहे. मुंबईच्या अनुष्का पाटीलने 42.067 गुण घेत रौप्यपदक मिळवले. तेलंगणाच्या निशिका अगरवाल हिने 44.333 गुण घेत सुवर्णपदक पटकावले, तर 41.233 गुण मिळवणारी ठाण्याची सारा राऊळ कांस्यपदकाची मानकरी ठरली आहे.
परिनाची सुवर्ण हॅटट्रिक
रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारात परिना मदनपोत्रा हिने लक्षवेधी कामगिरी करताना 3 सुवर्णपदके जिंकली आहेत. तिने रिबन, बॉल यासह ओव्हर ऑल प्रकारात सुवर्ण जिंकले आहे. मागील वर्षी संयुक्ता काळे या खेळाडूने 5 सुवर्णपदक जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.