। नागोठणे । वार्ताहर ।
स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असो.ने खेलो इंडिया अस्मिता पिंच्याक सिलाट वूमन्स लीग राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा कोपरखैरणे येथील क्रिस्ट अकॅडमी येथे 1 मे ते 4 मे रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये 30 राज्यातील एकूण 364 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी नागोठण्याची खेळाडू नेहा दोरे हिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना 75 ते 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे नेहा हिचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशिया मार्शल आर्ट प्रकारचा खेळ असून यामध्ये सोलो, टँडींग (फाईट), गंडा, रेगू (ग्रूप इव्हेंट), तुंगल (सिंगल इव्हेंट) अशा पाच प्रकारामध्ये खेळला जातो. नेहा ही नागोठणे येथे सुपर डायमंड मार्शल आर्टचे मास्टर धनंजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याचबरोबर यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत तिला 88 टक्के गुण मिळाले आहेत.