| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कर्जत खोपोली रस्त्यावरील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वर्णे गावच्या हद्दीत जमीन विकसित करणाऱ्या कल्पतरू बिल्डर ने खड्डे खोदले आहेत. त्यातील एका खड्ड्यात पडून कर्जत शहरातील गुंडगे गावातील आदिवासी वाडीमधील संजय महादू पाटील या 55 वर्षीय व्यक्तीचा पडल्याने मृत्यू झाला. दरम्यान, अशी हृदयद्रावक घटना वर्णे येथे घडली असून, कल्पतरू बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे.
कर्जत खोपोली रस्त्यावर पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत वर्णे गावाच्या हद्दीत कल्पतरू बिल्डर कडून शेकडो एकर जमीन विकसित केली जात आहे. गृह संकुल बांधणाऱ्या बिल्डरने तेथे पावसाळ्यातील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गटार खोडले आहेत. ती गटारे पक्की बांधण्यात आली असून, त्या ठिकाणी अनेक चेंबर खोदले आहेत. त्यातील एका चेंबरमध्ये कर्जत गुंडगे गावातील रहिवासी संजय महादू पारधी हे रात्रीच्या अंधारात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. संजय पारधी हे मजुरी करतात आणि ते सायंकाळी वर्णे येथे काम उरकून सोमवार रात्री येत होते. अंधार आणि पाऊस यामुळे संजय पारधी यांना रस्त्याच्या बाजूने असलेल्या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्या चेंबरमधील खड्ड्यात संजय पारधी पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुंडगे गावातील आदिवासी वाडीमधील अनेक लोक अपघात स्थळी पोहोचले आणि त्यांनी मृत व्यक्ती संजय पारधी यांच्या अपघाताची माहिती कर्जत पोलिस यांना दिली. कर्जत पोलिस ठाण्याचे हवालदार पाटील हे तात्काळ तेथे पोहचले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
मात्र, आज कर्जत गुंडगे येथील आदिवासी ग्रामस्थांनी संजय महादू पारधी यांच्या अपघातास कल्पतरू बिल्डर कडून खोदण्यात आलेल्या खड्डे आणि चेंबरसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे पारधी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मृत्यूस कल्पतरू बिल्डर वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.तर काही ग्रामस्थांनी कल्पतरू मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्या भागाचे रहिवासी आणि कर्जत नगरपरिषद माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.





