| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील प्रसिद्ध साठ्ये महाविद्यालयात एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले परिसरात साठ्ये महाविद्यालय आहे. गुरुवारी (दि.19) सकाळी या मुलीने साठ्ये महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलीचे नाव संध्या पाठक असे आहे. ती 21 वर्षांची असून, ती साठ्ये महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. या घटनेनंतर पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. संध्या पाठक ही तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर तिला तातडीने बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या कुटुंबीयांनी ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याचे सांगितले. तिने आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक शक्यता आहे. मात्र, संध्याच्या कुटुंबीयांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. तिला कोणीतरी ढकलेले असावे, असे संध्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या घटनेचा तपास सध्या विलेपार्ले पोलिसांकडून सुरु आहे.






