| पुणे | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोच्या भीषण अपघाताची घटना घडली. जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर बुधवारी (दि.18) रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास कारने पीकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेसह 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात जे जखमी झाले त्यांना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाब्याजवळ एक पिकअप टेम्पो थांबला होता. टेम्पोतील सामान खाली उतरवण्याचे काम सुरू होते. दोघे सामान उतरवत होते. त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. टेम्पोतील सामान उतरविणारे दोघे तसेच, ढाब्यासमोर थांबलेले तिघे आणि कारमधील तिघांचा अशा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन लहान मुले, एका महिलेचा समावेश आहे. ढाबाचालक आणि कामगारांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. कारचालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.