| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळूणमध्ये अनियमित वीजपुरवठा, नादुरुस्त विद्युद खांब व ट्रान्सफॉर्मरच्या तक्रारींबाबत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने शुक्रवारी (दि.20) शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देण्यात आली. वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना दिल्या जात असलेल्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोयी असून या सर्व बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्या.
चिपळूनमधील शहर व ग्रामीण भागातील वारंवार विद्युत खंडीत होण्याच्या तक्रारींत वाढ होत होती. त्याविरोधात चिपळूनमधील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी व शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्यावतीने महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजकुमार कोंडल व नितीन कांबळी यांच्या सोबत चर्चा केली. चिपळूण शहरातील वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठा, तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापन टीम, मुरादपूर सब स्टेशन, शहरांतील झाडे झुडुपे तोडणे तसेच अतिरिक्त तक्रार निवारण फोन क्रमांक वाढविणे, अशा अनेक तक्रारींबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच, यावर त्वरीत उपाययोजना करून शहरातील सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी पाऊले उचलावीत. अन्यथा पक्षातर्फे कठोर भूमिका घेत वेळ पडल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करू, असा इशारा ही यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावर सर्व स्तरांवर योग्य ती उपाययोजना सुरू आहे व आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही महावितरणे अभियंता व अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष मुरादभाई अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, कादीर भाई मुकादम, मनोज दळी, रोहन नलावडे, श्रीनाथ खेडेकर, परवेझ मेमन, सलमान मेमन, रूही खेडेकर व राधिका तटकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






