| चिपळूण | प्रतिनिधी |
पद्मश्री कै. डॉ. घरडा यांच्या स्वप्नातून आणि प्रेरणेतून साकार झालेल्या घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग आणि पंडित मदन मोहन मालवीय मिशन अंतर्गत महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रशिक्षणाकरिता ‘फोर कॉर्नर्स ऑफ क्वालिटी हायर एज्युकेशन’ हा एका आठवड्याचा अध्यापक विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, ब्लेंडेड क्लासरूम (ऑनलाइन आणि ऑफलाइन यांचा योग्य वापर), को-ऑपरेटिव्ह लर्निंग, तसेच फॉर्मेटिव्ह असेसमेंट अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, यामध्ये अनेक कृती सत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उत्तम अशी नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती तयार करणे, सर्व शिक्षकांना त्याचे ट्रेनिंग देणे आणि प्रत्येक शैक्षणिक संस्थेतील उपलब्ध संसाधनांमध्ये योग्य असा बदल करून त्याद्वारे शिक्षक-विद्यार्थी आणि एकंदर शिकण्या-शिकवण्याच्या पद्धती यामध्ये अमुलाग्र बदल घडवणे हे या शैक्षणिक धोरणाचा गाभा घटक आहे. या धोरणाला अनुसरून घरडा महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. नुकतेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून महाविद्यालयाचे मूल्यांकन होऊन त्यामध्ये ‘अ’ मानांकनाचा दर्जा मिळाला आहे. तसेच, नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन या केंद्रशासित मूल्यांकन संस्थेकडून सर्व अभियांत्रिकी विभागांना विशेष मान्यता मिळाली आहे.
या अध्यापन विकास कार्यशाळेच्या आयोजनामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मूळ मसुदा तयार करणाऱ्या डॉ. कस्तुरीरंजन समितीमधील आदरणीय सदस्य तसेच एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत आणि शिक्षणतज्ञ डॉ. अनंत मराठे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हा अध्यापन विकास कार्यक्रम एसएनडीटी विद्यापीठ आणि घरडा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय योजनेच्या संचालिका डॉ. जयश्री शिंदे यांचे देखील मार्गदर्शन लाभणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम 23 ते 28 जून या दरम्यान घरडा महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे. यामध्ये महाविद्यालयातील 60 शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे समन्वयक आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन कोळेकर यांनी दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांचे मार्गदर्शन आणि उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, सर्व विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.







